आपले सरकार सेवा केंद्र संचालकांच्या उपोषणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल...
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
गोंदिया, दि.२८ डिसेंबर २०२४
आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत मागील १३ वर्षापासून कार्यरत असलेल्या तालुका व जिल्हा व्यवस्थापक यांना नवनियुक्त रेलटेल व आयटीआय कंपनीने पदावरून कमी करून नवीन पद भरती केली. इतकी वर्ष सेवा देणार्या या व्यवस्थापकांवर मात्र सदर कंपनीने अन्याय केला. या विरोधात आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांनी जुन्याच व्यवस्थापकाला नियुक्ती देण्याच्या मागणीकरिता नागपूर येथे राज्यध्यक्ष स्नेहल पटेल यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण सुरु केले. या उपोषणाची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत त्यांची मागणी मान्य केली.
आपले सरकार सेवा अंतर्गत राज्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सेवा पुरविल्या जात आहेत. यात तुटपुंज्या मानधनावर मागील तेरा वर्षांपासून सेवा देणार्या तालुका व जिल्हा व्यवस्थापकांना नवनियुक्त कंपनी रेलटेल व आयटीआय यांनी पदावरून दुरु करून त्यांच्या ऐवजी नवीन भरती करण्याचा निर्णय घेतला होता. इतकी वर्ष सेवा देऊन देखील पदावरून काढून टाकल्याने अन्यायग्रस्त व्यवस्थापकानी कंपनी विरोधात बेमुदत उपोषण सुरु केले. सलग पाच दिवस चाललेल्या या उपोषणाला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज घोरपडे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत भेट घडवून आणली. या भेटी दरम्यान राज्यातील व्यवस्थापकांनी आपबीती कथन केली. याची मुख्यमंत्र्यांनी त्वरित दखल घेत ग्रामविकास विभागा मार्फत चुकीच्या पद्धतीने भरणा केला जात आहे. ही भरती त्वरित थांबवून मागील अनेक वर्षापासून सेवा देणार्या जुन्याच व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचे पत्र दिले गेले. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार मनोज घोरपडे यांनी राज्यध्यक्ष स्नेहल पटेल यांना निंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता केली. उपोषण दरम्यान आमदार संतोष बांगर, प्रिया तोडसाम, बाळासाहेब वानखेडे, राज्यमंत्री अॅड. आशिब जयस्वाल, किरण सामंत, बाळासाहेब मांगूळकर, बाबुराव कोडीकर आदी आमदारांनी उपोषण स्थळी भेट देऊन सहकार्य केले.