वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस ठाणे अंतर्गत निमसडा गावातील घटना...
शब्दसंदेश न्यूज वर्धा, दि.२८
शेतीच्या हिस्से वाटणीच्या कारणातून झालेल्या वादात पुतण्याने मायलेकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळ जनक घटना अल्लीपुर ठाणे अंतर्गत नीमसडा गावात घडली. विशेष म्हणजे, मायलेकाची हत्या केल्यानंतर आरोपीने ही विष पिऊन आत्महत्या केली. हे थरारक घटना २८ रोजी सकाळी ९:०० ते ९:३० वाजताच्या सुमारास घडली.
साधना सुभाष मोहिजे (४५ राह. निमसडा), नितीन सुभाष मोहिजे (२८ रा.निमसडा)असे मृतांची नावे आहे. तर आरोपी असलेला पुतण्या महेंद्र भाऊराव मोहिते (४७ रा.निमसडा) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत साधना आणि तिचा पुतण्या आरोपी महेंद्र यांच्यात शेतीच्या वाद होता याच वादातून 28 रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्यात शेतात तिघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी महेंद्रने साधना आणि तिचा मुलगा नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत दोघांना खल्लास केले. या घटनेने अल्लीपूर गाव परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनास्थळी पोलीस दल दाखल
निमसडा गावात घटना घडताच घटनास्थळी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. अल्लीपूर पोलिसासह स्थानीक गुन्हे शाखेचे पथक नीमसडा गावात दाखल झाले होते.
आरोपीची आत्महत्या
आरोपी पुतण्या महेंद्र मोहिते यांनी साधना व तिच्या मुलाला ठार मारल्यानंतर आरोपी महेंद्रने विष प्राशन केले. त्याला तात्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे.