धानाच्या बोनसवर दलालांचा डोळा ! : रजिस्ट्रेशन वेरीफिकेशनसाठी २५ टक्के रक्कमेची मागणी
शब्दसंदेश न्यूज सालेकसा, दि.१२ : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण करून संबंधित सरकारी धान खरेदी सोसायट्यांमध्ये धान विक्री केली. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनस रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना काही शेतकऱ्यांनी धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. ज्या सोसायट्यांमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्या सोसायट्यांकडून त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या वेरीफिकेशनसाठी थेट बोनस रकमेच्या २५ टक्के रक्कमेची मागणी केली जात आहे. 'प्रथम २५ टक्के रक्कम भरा, मगच वेरीफिकेशन केले जाईल,' असे स्पष्टपणे सांगितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले असून तहसीलदाराकडे तक्रार करण्यात आली आहे.
राज्य शासनाने पावसाळी काही शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या वेरीफिकेशनसाठी काही सोसायट्यांकडून २५ टक्के रक्कमेची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून यासंदर्भात पुढील कारवाईसाठी आम्ही पणन अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवले आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. - नरसय्या कोडागुरले, तहसीलदार, सालेकसा
अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रती हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर केला होता. दोन हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठीही रक्कम देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून बोनस मिळणार, या आशेवर शेतकरी होते. परंतु, ज्या सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांनी धान विक्री केली. त्या सोसायट्यांकडून रजिस्ट्रेशनच्या वेरीफिकेशनसाठी थेट बोनस रकमेच्या २५ टक्के रक्कमेची मागणी केली जात आहे. अशा स्थितीत बोनस रक्कमेसाठीही खुलेआम लाच मागितली जात असल्याने शासनाच्या योजनात कुरघोडी करून दलाली खान्याचा प्रकार सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यातही धान खरेदी केंद्रांवर अशा प्रकारच्या लाचलुचपतीचे प्रकार नेहमीच समोर येतात. त्यामुळे यावेळी देखील शासनाने तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर शिक्षेची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकाराची लेखी तक्रार सालेकसा तालुक्यातील कहाली आणि परिसरातील काही शेतकऱ्यांनी तहसीलदार नरसय्या कोडागुरले यांच्याकडे केली आहे.