जिभेचे चोचले पडणार महाग
बाहेरच्या पदार्थांतून शरीरावर विपरीत परिणाम
शब्दसंदेश न्यूज देवरी, दि.२१: पावसाळ्यात नागरिक बाहेरच्या खाण्यावर ताव मारताना दिसत आहेत. मात्र पावसाळ्याचा काळ हा आजारांचा काळ असून बाहेरचे खाणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चाट व चायनिज ठेल्यांवर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. मात्र पावसाळ्यात जिभेचे चोचले महाग पडून शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. बाहेरच्या पदार्थात वापरण्यात येणारे तेल, मसाले, पाणी व तेथील स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे घटक असून यात किंचितही कमी-जास्त झाल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. यामुळेच पावसाळ्यात बाहेरचे खाणे टाळणे महत्त्वाचे असून घरातील साधे जेवण आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या टपऱ्यांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त मिळत असल्याने कित्येकदा पैसे वाचविण्याच्या नादात नागरिक रस्त्यावरील पदार्थ खातात. मात्र त्या पदार्थांना बनविताना पाहिजे तशी स्वच्छता बाळगली जात नाही. शिवाय तेल, मसाले, भाज्या व पाण्याची गुणवत्ता नसल्यास ते खाद्य पदार्थ शरीरासाठी अपायकारक ठरतात. अशातूनच फूड पॉयझनिंग होऊन कधी-कधी जीवही जातो. ग्रामीण भागातही असे प्रकार घडताना दिसतात.
पावसाळ्यात असा घ्या आहार
मेथीच्या दाण्यात अँटीमायक्रोबायल तत्त्व असल्यामुळे इंफेक्शनपासून बचाव होतो. त्यामुळे मेथीच्या दाण्याचे पाणी प्यावे. कारल्याचा ज्यूस तसेच तुळस, हळद, लवंग, वेलची, काळीमिरी, दालचिनीपासून घरात तयार केलेला काढा प्यावा. हंगामानुसार येणारे फळ जसे जांभूळ, आवळा, लिचीचे सेवन करावे. हंगामानुसार येणाऱ्या भाज्या जसे परवल, दोडके, दुधी आदींचा आहारात समावेश करावा. जेवणात डाळींचा वापर करावा तसेच बदाम खावे व नियमित गरम पाणी प्यावे.