कुडेगाव येथील घटना
शब्दसंदेश न्यूज बारव्हा, दि.१६: सायंकाळच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या एका दोन वर्षीय चिमुरडी बालिकेसह दोन महिलावर एका मुंगसाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजताच्या दरम्यान घडली. यात ऋत्वि शेखर राऊत (२), मीना मोहन राऊत (६०), ममता आशिष राऊत (३०) अशा एकाच कुटुंबातील तिघीजणी गंभीर जखमी झाल्या.
प्राप्त माहितीनुसार ऋत्वि ही दोन वर्षीय बालिका घटनेच्या वेळी घरासमोरील अंगणात खेळत होती. तर आजी मीना व काकू ममता ह्या दोघाजणी घरगुती काम करीत होत्या. यावेळी एका मुंगसाने खेळत असलेल्या बालिकेवर हल्ला करून चावा घेतला. हे घरी असलेल्या आजीच्या लक्षात येताच तिने बालिकेच्या बचावासाठी धाव घेतली. मात्र तिलाही मुंगसाने चावा घेवून जखमी केले. या घटनेचा काही काळ लोटत नाही. तोच कुटुंबातील ममता नामक महिलेवरही मुंगसाने हल्ला करून गंभीर जखमी केले. एकाच कुटुंबातील या तिन्ही जखमीवर कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या घटनेच्या काही दिवसापूर्वी याच गावातील वनमाला लक्षमन नागरकर (६०) व दुर्गा चंद्रशेखर देशकर (२६) नामक दोन महिलावर मुंगसाने हल्ला चढवून जखमी केले होते.