सोनोग्राफी दरम्यान डॉक्टरचे अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

Shabd Sandesh
0

डॉक्टर फरार : पोस्कोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; साकोली शहर पोलिस ठाणे हद्दीतील घटना

शब्दसंदेश न्यूज साकोली, दि.११: 

एका हॉस्पिटलमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफीच्या नावाखाली डॉक्टरने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी साकोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. देवेश अग्रवाल याच्याविरुद्ध पोस्कोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माहितीनुसार, पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉ. देवेशने सोनोग्राफी करावी लागेल असे सांगून आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत एकांतात तब्बल अर्धा तास गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर मुलीने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी साकोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉ. देवेश अग्रवाल याच्याविरुद्ध पोस्को कायदा आणि भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर अद्याप फरार आहे. या घटनेमुळे साकोली शहरात संतापाची लाट पसरली आहे. डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

         पाठवली होती फ्रेंड रिक्वेस्ट

पीडित मुलीने आईला रडत रडत घडलेली घटना सांगितली. पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरने मुलीच्या कपड्यांवरून हात लावून तिच्याशी गैरवर्तन केले. डॉक्टरने मुलीचा हात धरून मोबाइल क्रमांक मागितला आणि बाहेर कोणालाही काही सांगू नको, असे बजावले. यापूर्वीही डॉक्टरने इन्स्टाग्रामवरून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याचे जबाबात नमूद केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)