शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.०९: जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आंध्रप्रदेशातून आलेल्या दोन चोरट्यांना यवतमाळ येथून अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पहिली घटना:
दिनांक 21 जून 2025 रोजी दुपारी 3.35 ते 3.45 वाजेच्या सुमारास रेंगेपार/दल्ली येथील रहिवासी अरविंद नारायण डोंगरवार यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी बॅगसह 20,000 रुपये चोरले होते. ही घटना सडक/अर्जुनी येथील मुंगुलमारे पंप समोर घडली.
दुसरी घटना:
दिनांक 24 जून 2025 रोजी दुपारी 4 ते 4.45 दरम्यान गोंदिया येथील तहसील कार्यालयाजवळ उभी असलेल्या धनराज देबीलाल रहांगडाले यांच्या चारचाकी वाहनाचे काच फोडून गाडीतील बॅगमधून 60,000 रुपये लंपास करण्यात आले.
दोन्ही प्रकरणांत डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या कसोशीन तपासातून दिनांक 3 जुलै 2025 रोजी चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपी –
1. रोडादासु रोडाबाबु दास (वय 34 वर्षे)
2. प्रविणकुमार मेकाला दास (वय 25 वर्षे)
– दोघेही रा. बिरगुंटा, ता. दारवरम, जि. नेल्लोर (आंध्रप्रदेश) यांना यवतमाळ येथून अटक करण्यात आली.
पोलीस यंत्रणेचे कौतुकास्पद कार्य:
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहेत. ही संपूर्ण कारवाई मा. गोरख भामरे (पोलीस अधीक्षक, गोंदिया), श्री. विवेक पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री. गणेश वनारे यांच्या नेतृत्वात पोउपनि प्रेमकुमार शेळके, पोहवा आशिष अग्निहोत्री, पोना महेंद्र सोनवाने, संजीव चकोले, निखील मेश्राम यांनी केली.
सध्या तपास चालू असून पुढील तपास पोउपनि प्रेमकुमार शेळके करत आहेत.