महालगाव येथील धक्कादायक घटना
पाईप बदलविण्यास गेला होता शेतात...
शब्दसंदेश न्यूज साकोली, दि.१९: तालुक्यातील महालगाव शेतशिवारात दि. १७जुलै २०२५ रोजी सायं. ७ वाजता दरम्यान धक्कादायक घटना घडली. विहिरीवरील पंपाचे पाईप बदलविण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरल्याने विहिरीत पडून दुदैवी मृत्यू झाला. सतिश (मुन्ना) गिरधारी बहेकार (४१) रा. महालगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
साकोली तालुक्यातील महालगाव परिसरात रोवणीचे काम धडाक्यात सुरू आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला. मात्र काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी मोटारपंपाद्वारे धान लागवड करीत आहेत. सतिश बहेकार हा शेतकरी
दि. १७ जुलै रोजी सायं. ७ वाजता दरम्यान शेता तील मोटारपंपाचे पाईप बदलविण्यास जातो असे सांगून शेतात गेला. त्यावेळी पावसाची रिपरिप सुरू होती. विहिरीजवळ पाईप बदलविण्याच्या नादात अचानक पाय घसरल्याने त्याचा तोल जावून विहिरीत पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. बरीचवेळ होवूनही सतिश घरी न पोहचल्याने त्याच्या कुटूंबियांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेतात जावून पाहिले असता विहिरीत प्रेत आढळून आले नाही. मात्र विहिरीत पडल्याचा अधिकच संशय बळावला होता. काही वेळेनंतरव प्रेत पाण्याच्यावर आल्यानंतर प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी साकोली पोलिसांनी त्याचवेळी धाव घेऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. त्याचे मृत्यूपश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार असून त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.