सुकळी येथील प्रकार; बच्चू कडूंची उपस्थिती
शब्दसंदेश न्यूज कारंजा, दि.०९: प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चु कडू यांनी अनियंत्रित कायदा सुव्यवस्था, दिव्यांगाची हेळसांड, जातीवाद, शेतकरी शेतमजूर, आत्महत्या, बेरोजगारी, धिम्म प्रशासन व असुरक्षित महिला यासह शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्व. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापड येथून पहिली शेतकरी आत्महत्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण पर्यंत पायदळ यात्रा सुरू केली आहे. ८ जुलै रोजी ही पायदळ यात्रा कारंजा तालुक्यातील सुकळी येथे पोहोचली असता शेकडो शेतकऱ्यांच्या व बच्चु कडू यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी सुकळी येथे तीन एकर शेतात चक्क भाजपाच्या झेंड्याची लागवड केली. सुकळी येथे चार एकर एवढे शेत असून त्यातील तीन एकर शेतात भाजपाच्या झेंड्याची लागवड करण्यात आली. रासायनिक खते व बी बियाण्यांच्या वाढत्या किमती, शेतमालाला नसलेले भाव, वन्य प्राण्यांचा उपद्रव, नैसर्गिक संकटांमुळे होत असलेले अल्प उत्पन्न यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. किमान सत्तेवर असलेल्या भाजपाच्या झेंड्याची लागवड केल्यास तरी उत्पन्न वाढेल आणि शेतमालाला भाव मिळेल या आशेने उपस्थित शेतकऱ्यांनी भाजपाच्या झेंड्याची लागवड केल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. सन २०१९ मध्ये सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत होता. परंतु आता मात्र उत्पादन खर्चात वाढ होऊनही सोयाबीन प्रतिक्विंटल तीन ते साडे तीन हजार रुपयांनी विकावे लागले. तूर आणि कपाशीची परिस्थिती काही यापेक्षा वेगळी नाही. नैसर्गिक संकटे शेतीमालाला मिळत नसलेला भाव उत्पन्नातील घट यामुळे शेतकरी दिवसेंदिवस हतबल होत असून शेती करावी की सोडून द्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुकळी येथील शेतकऱ्यांनी भाजपाच्या झेंड्याची केलेली लागवड हा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला असून किमान आता तरी सरकारने लाज बाळगून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा तसेच गांजा आणि अफूचे पीक घेण्याकरिता परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
पिक घेतल्यापेक्षा भाजपाचे झेंडे लावलेले बरे..
केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार आहे. असे असताना देखील शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे पेरून काही फायदा नाही. म्हणून पीक घेतल्या पेक्षा भाजपाचे झेड़े लावलेले बरे. एका एकरात जवळपास ४ क्विंटल सोयाबीन उत्पन्न होते. त्याला ३५०० रुपयांचा भाव मिळतो. म्हणजेच एकरी उत्पन्न १५ हजार आणि खर्च ८० हजार. हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने शेतात पिक घेतल्यापेक्षा भाजपाचे झेंडे लावलेले बरे.
माजी आमदार बच्चूभाऊ कडू अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष