देवरी,दि.07 :
आमगाव विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या नेत्याने बंडखोरी कायम ठेवली आहे. आमगाव विधानसभेत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून या बंडखोरीचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांची मनधरणी केली जात होती. मात्र माघार न घेता ऐकाने निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे आमगाव विधानसभेत महायुतीचे उमेदवार निवडून येणार का? याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.
आमगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विलास चाकाटे यानीं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीमध्ये आमगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला(SP) मिळावा, यासाठी विलास चाकाटे प्रयत्नशील होते. पण, आमगाव विधानसभेमधून महाविकास आघाडीने कॉंग्रेसचे राजकुमार पुराम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विलास चाकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटच्या क्षणापर्यंत चाकाटे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेर त्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आता आमगाव विधानसभेत तिरंगी लढत होणार असून त्याचा फायदा मात्र महायुतीला होण्याची शक्यता वाढली आहे.