केंद्र सरकारच्या निर्णय; शेतकरी कुटुंबाला फटका
अनेकांचा होणार पत्ता कट; आयकर भरणाऱ्यांना वगळणार
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क
देवरी, दि.१५ जानेवारी २०२५
पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानंतर एकाच कुटुंबातील पती,पत्नी,मुलगा, मुलगी लाभ घेता घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती,पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे.त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापुढे जे वकील,डॉक्टर, इंजिनियर आहेत. जे आयकर भरतात जे पेन्शनवर आहेत त्यांनाही यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आली. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे. ज्यावेळी ही योजना सुरू झाली. त्यावेळी एकाच कुटुंबातील पती-पत्नी, मुलगा,मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला.
शेतकरी पीएम किसान साठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात. त्यांना या योजनेचा लाभही मिळतो. मात्र काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांनाही ई केवायसी करण्यासाठी सांगितले जाते.एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचीच कागदपत्रे असूनही वारंवार ई केवायसी करायला का सांगितले जाते. हा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
पी एम किसान चे पैसे कधी येणार
पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत.१९ व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना १९ वा हप्ता जारी करू शकते. मात्र सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही.