धान उत्पादक शेतकऱ्यांना आता लागले बोनस चे डोहाळे

Shabd Sandesh
0
सहा महिने लोटूनही, बँक खाते मात्र, रिकामे..
  
शब्दसंदेश न्यूज देवरी, दि. १० जून २०२५

       महाराष्ट्र राज्य सरकारने गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात धानाला प्रतिहेक्टर वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टर पर्यंत मर्यादित शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती. तसेच शासन परिपत्रकही काढण्यात आले. सांगण्यात आले की, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा केली जाईल. मात्र सहा महिन्याचा कालावधी लोटूनही आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनस जमा झाले नाही. आज उद्या शासन मायबाप घोषित केलेले बोनसचे पैसे बँक खात्यात जमा करेल, अशी आशा बाळगून असलेले शेतकरी रोजच बँकेच्या चक्रा मारीत आहेत. शासनाने पाठविलेच नाही तर, बँकेत जमा तरी कुठून होणार? त्यामुळे बोनसची रक्कम बँक खातात कधी जमा होणार. असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 
     शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे हा व्यवसाय बिन भरोशाचा उरला असून दरवर्षी तोट्याच्या सौदा ठरत आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, रोगराई, पूर परिस्थिती असे संकटावर संकट आले असताना, त्यावर मात करून शेती केली. मात्र, त्या तुलनेत धान पिकाच्या उत्पादनात घट होऊन खर्चही निघाले नाही. याची जाणीव ठेवून सरकारने प्रतिहेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना बोनस देण्याचे जाहीर केले. तसे परिपत्रकही काढण्यात आले. ही बोनस ची रक्कम सरकार ३१ मार्चपर्यंत खात्यात जमा करेल, अशी आशा होती. कारण शेतकरी सोसायटी व बँकेचे घेतलेले कर्ज हा ३१ मार्च पर्यंत भरतो. त्यामुळे ही बोनसची रक्कम मिळेल ही अपेक्षा होती. देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार सिंचन सुविधा करून, रब्बी हंगाम पिकांची मोठ्याप्रमात लागवड केली. मात्र,यंदा तोंडी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने पुन्हा एकदा शेतकरी कर्जाच्या खाईत ओढवला गेला आहे. इकडे अवकाळी मुळे झालेल्या शेत पिकाचे नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे बोनस कधी मिळणार याकडे बळीराजाचे डोळे एकवटले आहेत. अशी द्विअवस्था शेतकऱ्याची झाली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)