तितर, नवरंग, छोटा खंड्या पक्षी बनले पर्जन्यदूत!

Shabd Sandesh
0
हवामानातील बदलांची पूर्वकल्पना पक्षांच्या हालचालीतून मिळते...
       
      शब्दसंदेश न्यूज देवरी, दि.१० जून २०२५
    
    निसर्गाशी घट्ट नाते असलेल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना हवामानातील बदलांची पूर्वकल्पना पक्षांच्या हालचालीतून मिळते. पावसाचा आगमन काळ जवळ आल्यावर काही पक्षांचे वर्तन, आवाज आणि हालचाली बदलतात. यावरून शेतकरी आणि निसर्गप्रेमी पावसाचे संकेत ओळखतात. हे निरीक्षण केवळ तात्पुरते नाही तर, अनेक पिढ्यांपासून चालत आलेली एक समृद्ध पारंपारिक ज्ञान संपत्ती आहे.
   ज्याप्रमाणे हवामान खातं आधुनिक तंत्रज्ञानाने पावसाच्या अंदाज लावतो. त्याचप्रमाणे निसर्गातले काही पक्षीही स्वतःच्या अंगी असलेल्या नैसर्गिक संवेदनेच्या आधारे पावसाच्या आगमनाची सूचना देतात. यामध्ये "पावशा" हा पक्षी विशेष ओळखला जातो. "पेरते ते व्हा!" असा आवाज ऐकू येऊ लागला की, शेतकरी मशागतीसाठी तयारी सुरू करतात. या पक्षाला "पर्जन्य दूत" मानले जाते. त्याचा आवाज आणि वावरणे हे निसर्गात बदल घडत असल्याचे स्पष्ट लक्षण असत. त्याचप्रमाणे "नवरंग" पक्षीही आपल्या खास आवाजाने पावसाच्या जवळ येण्याची माहिती देतो. निसर्ग निरीक्षक आणि पक्षी अभ्यासक सांगतात की, नवरंगाचा आवाज ऐकू येऊ लागला की, हवामानात बदल पडतो आहे हे निश्चित मानावं. शेतकऱ्यांनीही यावर अनेक वर्ष विश्वास ठेवला असून, त्यांच्या अनुभवातून या पक्षाच्या सवयीचे निरीक्षण अधिक बळकट झाले आहे.
   "तिबोटी खंडवा" "निळ्या कानाचा खंडता" "छोटा खंड्या"हे पक्षीही मे महिन्यातच पावसाची चाहूल देतात. हे पक्षी प्रामुख्याने जलाशयाजवळ किंवा ओल्या जागा मध्ये फिरू लागतात. यामुळे येणाऱ्या काळात पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे "पान कोंबडी" आणि "मोर" हेही पक्षी पावसापूर्वी जोरात ओरडत असतात. जे देखील हवामानातील आद्रतेच्या परिणाम असतो असा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो." तितर" हा आणखी एक महत्त्वाचा पक्षी आहे. अंगावर काळे पांढरे ठिपके असलेला हा पक्षी "कोंड्यांन केको, कोंड्यानं केको" अशा विशिष्ट स्वरात ओरडतो.
   याचा अर्थ पावसाचा काळ जवळ आला आहे असा संदेश मानला जातो. शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, तितर पक्ष्याचा हा सांकेतिक आवाज फार विश्वसहर्त संकेत असतो. सर्वात विलक्षण बाब म्हणजे आफ्रिकेतून येणारा "चातक पक्षी" हा पक्षी "पिऊ पिऊ" असा आवाज करतो. शास्त्रज्ञ सांगतात की चातक पक्षी आकाशात पडणाऱ्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो. त्याचे हे वर्तन अनेक वर्ष नोंदवले गेले असून त्याच्या आवाजावरूनही पावसाची चाहूल लागते.

   कोकीळ, कावळा आणि चिमणी हे पक्षी आपली वर्तनशैली बदलतात. कोकिळाच्या मधून स्वर, कावळ्याचे टोळक्याने ओरडणे, चिमण्यांची अधिक सक्रिय हालचाल यावरून वातावरणात बदल होत असल्याचे संकेत मिळतात. हे सगळे लक्षणे मिळून शेतकऱ्यांना अंदाज बांधता येतो की, लवकरच पाऊस येणार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)