ग्राहक पंचायतीचा विद्युत विभागाला इशारा
आमगाव प्रतिनिधी, दि.१०
शब्द संदेश न्यूज नेटवर्क
स्मार्ट व प्रीपेड मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवर ग्राहकांची संमती घेणे अत्यावश्यक आहे. संमतीशिवाय मीटर बसवणे गैरकायदेशीर व लोकभावनेविरोधी आहे, असा ठाम विरोध अखिल भारतीय ग्राहक पंचायत, आमगाव शाखेने नोंदवला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंता भांडारकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले की, सध्या कार्यरत असलेली पोस्टेड मीटर प्रणाली सुरळीत चालू असून, तीच पद्धत कायम ठेवावी. स्मार्ट वा प्रीपेड मीटर लावण्यापूर्वी ग्राहकांची स्पष्ट संमती घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे, अशी भूमिका पंचायतीने मांडली. या निवेदनादरम्यान उपअभियंता भांडारकर यांनीही खात्री दिली की, "घरमालकांची स्पष्ट संमती घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा नवीन मीटर बसविला जाणार नाही."
या वेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राचार्य व्ही. डी. मेश्राम, संघटन मंत्री जगदीश शर्मा, बी. एम. कटरे, संतोष पुंडकर, नरेंद्र बहेटवार, रमेश लिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागात स्मार्ट व प्रीपेड मीटर प्रणालीविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी असून, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.