ऑटो रिक्षा चालकाला युतीने शिकविला धडा

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.२९: तालुक्यातील कामठा परिसरातील एक युवती शासकीय कामानिमित्त गोंदिया येथे आली होती. काम आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी तिने गोंदिया शहरातून रावणवाडी मार्गावर जाणाऱ्या एका ऑटोची मदत घेतली. सुरुवातीला इतर प्रवासीही ऑटोमध्ये होते, मात्र रावणवाडी स्थानकाजवळ सर्व प्रवासी उतरल्यावर ती युवती एकटीच उरली. मात्र ती एकटी असल्याचे जाणून ऑटो चालकाने गैरकृत्य करण्याचा प्रकार केला. दरम्यान सदर युवतीने धाडस दाखवून त्याऑटो चालकाला धडा शिकवला. ही घटना २६ जून रोजीची आहे.
     सविस्तर असे की, २६ जून रोजी गोंदिया वरून काम आटोपून सायंकाळच्या सुमारास गावी परत जात असताना रावणवाडी येथे सर्व प्रवासी उतरले. मात्र ती युवती ऑटोमध्ये एकटीच राहिली. याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने ऑटो चालकाने डिझेल भरण्याच्या निमित्ताने वाहन पेट्रोल पंपाकडे वळवले. मात्र डिझेल भरल्यानंतर ऑटोने अपेक्षित मार्गाने न जाता विरुद्ध दिशेने प्रवास सुरू केला. याची कल्पना येताच युवतीने ऑटोचालकाला प्रश्न विचारला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने प्रसंगावधान राखत चालत्या गाडीतून उडी घेतली आणि थेट रावणवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. घटनेची गंभीरता लक्षात घेता, पोलीस निरीक्षक वैभव पवार व त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित ऑटोचालकाला ताब्यात घेतले. ही घटना किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक असून, अशा घटनांपासून बचावासाठी अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)