तुमसर तालुक्यातील रोंघा गावात शोककळा
शब्दसंदेश न्यूज गोबरवाही भंडारा, दि.२०
गावालगतच्या तलावाजवळ मित्रासोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणा पैकी एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. तुमसर तालुक्यातील गोबरवाई पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोंघा गावात ही घटना दि.१८ दुपारी ३:३० वाजता दरम्यान घडली. सचिन सेवकराम दुर्वे (३१) असे या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गावालगत असलेल्या तलावामध्ये नऊ मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान जेवण झाल्यानंतर मित्रांनी पोहण्याची इच्छा केली. सचिनही पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला. अन्य मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. घटनेची माहिती मित्रांनी गावात दिली. सकाळपर्यंत शोध कार्य सुरू होते. गुरुवारी सकाळी त्याचे प्रेत बाहेर काढल्यावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनला वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. मजुरी करून तो आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करत होता. घरचा कमावता गेल्याने कुटुंबावर मोठे संकट आले आहे.