'अॅप' ला चेहरा दाखवा; घरबसल्या 'हयातीचे प्रमाणपत्र' मिळवा!

Shabd Sandesh
0
पेन्शनधारकांना दिलासा, केंद्र मंत्रालयाने 'जीवन प्रमाण' नावाचे अॅप केले तयार

शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.२९: तुम्ही निवृत्तिवेतनधारक आहात. तुम्हाला दरवर्षी बँकेत हयातीचा दाखल द्यावा लागतो, त्यासाठी पीएफ कार्यालयात अनेक खेटे मारावे लागतात. वेळेवरहयातीचे प्रमाणपत्र दाखल केले नाही तर निवृत्तिवेतन बंद होण्याची भीती असते. आता हा त्रास वाचविण्यासाठी खास निवृत्तिवेतनधारकांसाठी केंद्र सरकारने 'जीवन प्रमाण अॅप' आणले आहे. याद्वारे घरी बसूनच तुम्ही आता 'हयातीचा दाखला' काढू शकता. ऑनलाइन बँकेत हे हयातीचे प्रमाणपत्र दाखल होऊ शकते. या अॅपमध्ये चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आहे.

निवृत्तिवेतनधारकांना दरवर्षी हयातीचा दाखला बँकेत जमा करावा लागतो. त्यासाठी याद्वारे निवृत्तिवेतन घेणारी व्यक्ती जिवंत आहे हे सुनिश्चित केले जाते. हे हयातीचे प्रमाणपत्र दिले नाही, तर निवृत्तिवेतन थांबविले जाते. यामुळे दरवर्षी हयातीचा दाखला द्यावाच लागतो.

शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू झाल्यानंतर दरवर्षी हयात दाखला सादर करावा लागतो. यासाठी पीएफ कार्यालयात जाऊन दाखला सादर करावा लागतो. मात्र, आता पेन्शनधारकांना हयातीच्या दाखल्यासाठी पीएफ कार्यालयाकडे जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या मोबाइल अॅपवरून हा दाखला मिळणार

जीवन प्रमाण अॅपवर निवृत्तिधारकांचा आधार क्रमांक, नाव, बँक खात्याचा क्रमांक तसेच नोंदणीकृत मोबाइल नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) माहिती द्यावी लागते. विशेष म्हणजे, अॅपवरही माहिती भरल्यावरच पुढील प्रक्रिया सुरू होते. संपूर्ण माहिती अॅपवर डाऊनलोड करावी लागते. त्यानंतर हयातीचे प्रमाणपत्र मिळते.

केंद्रीय मंत्रालयाने त्याला नवी सुविधा दिली आहे. अशा पेन्शनधारकाला हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. सेवानिवृत्त आणि वृद्ध नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले आहे.

आता 'जीवन प्रमाण अॅप' हे डिजिटल माध्यम केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहे. यामुळे निवृत्तिवेतनधारकांना ईपीएफओच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. घरूनच हयातीचे प्रमाणपत्र भरून दाखल करता येते.

अॅपवर मिळवा दाखला

केंद्र मंत्रालयाने 'जीवन प्रमाण' नावाचे अॅपतयार केले आहे, आपण मोबाइल, कॉम्प्युटरवर प्ले स्टोअरला जाऊन 'जीवन प्रमाण अॅप डाऊनलोड करू शकता. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर नोंदणी करावी लागते. यात चेहरा प्रमाणीकरण केले जाते. हे सर्व डिजिटल करता येते. घरबसल्या हयातीचा दाखला मिळू शकतो. यामुळे वृद्ध पेंशनधारकांना दिलासा मिळणार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)