कुरियरच्या नावावर सदनिकेत केला प्रवेश
युवतीच्या डोळ्यावर मारला स्प्रे
पुणे पोलिसांनी आरोपीचे केले स्केच जारी
अकोला शब्दसंदेश न्यूज, दि.०५
पुणे जिल्ह्यातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत अकोल्यातील रहिवासी असलेली युवती अभियंता म्हणून एका कंपनीत कार्यरत आहे. तिच्यावर कुरियरमधील एका युवकाने सदनिकेत प्रवेश करून तिच्या डोळ्यावर स्प्रे मारत लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अज्ञात आरोपी युवकाचे स्केच जारी केले आहे.
अकोल्यातील रहिवासी असलेली युवती अभियंता म्हणून पुणे येथे एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे. तिचा भाऊ व ती एका सदनिकेमध्ये वास्तव्यास आहे. तिचा भाऊ गावी गेल्याने या संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपी युवकाने कुरियरच्या नावावर अपार्टमेंटमधील सदनिकेत कुरियर असल्याची बतावणी करून युवतीला बोलण्यात व्यस्त ठेवले. तसेच सदर कागदपत्रावर युवतीची स्वाक्षरी हवी असल्याची सबब पुढे करून तिच्या डोळ्यावर स्प्रे मारून नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारप्रकरणी तक्रार देण्यात आली असून, कोंढवा पोलिसांनी अज्ञात आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी युवकाचे स्केच जारी करून या गंभीर तपासाला गती दिली आहे. लवकरच सदर आरोपी युवकाला जेरबंद करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
