पॅक्सोखाली अटक; चंद्रपूरच्या शाळेत शिक्षकाचा संतापजनक कृत्य
शब्दसंदेश न्यूज चंद्रपूर, दि.१६: विद्यादानाचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासून चक्क पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी चंद्रपुरात समोर आली. याप्रकरणी लक्ष्मीकांत धर्मपुरीवार (५२) या शिक्षकाला पडोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या एका शाळेत शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी पाचव्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आपल्या मैत्रिणीला दिली. तिने ही माहिती पीडित मुलीच्या आईला सांगितली. त्यांनी लगेच त्या शाळेत कार्यरत असलेल्या दुसऱ्या शिक्षिकेला याबाबत जाब विचारला असता, त्यांनी शाळेत चौकशी करते, असे सांगितले. त्या शिक्षिकेने शाळेत चौकशी केल्यानंतर व्यवस्थापन समिती, तसेच पं.स. प्रशासनाला सांगितले. त्यांनी लगेच शाळेत येऊन चौकशी केली. त्यानंतर वरिष्ठांना आदेशाने पडोली पोलिसात तक्रार केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शिक्षक लक्ष्मीकांत धर्मपुरीवार याच्याविरुद्ध बीएनएस ७४ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार योगेश हिवसे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रोशन इरपाचे करीत आहेत.
प्रशासनाने घेतली दखल
शाळेत विनयभंगाची माहिती चंद्रपूर पंचायत समिती प्रशासनाला मिळताच गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, विस्तार अधिकारी मनोज गौरकार, केंद्रप्रमुख विवेक वल्लभकर, प्रभारी विस्तार अधिकारी प्रकाश झाडे यांची चमू दाखल झाली. त्यांनी सर्वांशी चर्चा करून वरिष्ठांना माहिती दिली. त्याच्या आदेशान्वये ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.