साप विषारी की बिनविषारी ओळखणे अवघड
साप दंशाच्या भितीमुळेही जाऊ शकतो जीव
शब्दसंदेश न्यूज देवरी, दि.०२: आता सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून शेतातील रोवणी जोमात सुरू झाली आहे. जमीन जलमय झाल्याने अशावेळी साप बिळाच्या बाहेर निघत असतात. तणसाचे ढिग उचलताना किवा लाकडे रचताना साप दिसत असतो. तसेच वाटरपंच सुरू करताना बहुधा साप आढळून येतात. अशावेळी सावध राहून काम करणे हिताचे आहे. साप दिसला की मोठमोठ्यांची घाबरगुंडी उडत असते. धानाचे पन्हे काढताना सुध्दा साप आढळून येतात. परंतु प्रत्येक साप विषारी नसतो. परंतु, कधी कधी बिन विषारी साप चावल्याने त्या व्यक्तीचा भितीपोटी मृत्यूही होवू शकतो.
पावसाचे पाणी सापाच्या निवासाच्या जागेत शिरल्याने अनेक साप आडोशा शोधण्यासाठी बाहेर निघतात. अशा हंगामाच्या वेळी पाऊस पडल्याने जमिनीवर हिरवेगार गवत निर्माण होत असते. या गवतावर विविध प्रकारचे जिवजंतू निर्माण होत असतात. साप आपल्या बिळातून बाहेर आल्यावर गवतावरील जीवजंतूना भक्ष्य करीत असतात. काही साप भक्ष्याचे मागे लागून जमिनीवर सरपटत असताना एखाद्या व्यक्तीचा पाय सापावर पडल्यास साप त्याला दंश करीत असतो. सापामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. एका जातीमधील साप तापट, रागीट व शांत स्वभावाचेही असतात. काही साप मनुष्य किंवा एखादा प्राणी दिसल्यास त्यावर तुटून पडतात. परंतु काही साप एवढे शांत असतात की त्यावर पाय पडले तरी शांतपणे निघून जातात. ज्याप्रमाणे व्यक्तीमध्ये स्वभावाचे गुण आहेत तसेच गुण सापात व विविध जीवजंतूमध्ये असतात. असाच प्रकार पाळीव प्राण्यांमध्ये सुध्दा असतात. गायी, म्हशी, शेळी, मेंढ्यातही दिसून येतात. सापामध्ये विषारी व बिन विषारी साप असतात. विषारी साप चावल्यास दंश झालेल्या जागी थोडे दुखणे वाढते. जळजळ होणे, आग होणे, दंश केलेल्या जागी बधिरता येते. चक्कर येते, तोंडातून फेस निघतो, बरेचदा दातखिळी बसते. नाडी बंद पडून हृदयाचे ठोके वाढतात. विषारी साप चावल्याने मेंदू व हृदयाची क्रिया बंद पडत असते.
शेतातील तणस उचलताना गवताचा भारा उचलताना किंवा स्वयंपाकासाठी लागणारे जळावू लाकडे उचलताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना रात्री अपरात्री सिंचन करण्याकरीता जावे लागते. तेव्हा हातात काही टार्च घेऊनच जावे. अंधारात चालताना किंवा शेतात जाताना पावसाळ्यात लक्षपूर्वक चालणेच हिताचे आहे.