"वंदे मातरम्" गीताच्या १५० व्या वर्षाचा सार्धशताब्दी सोहळा उद्या

Shabd Sandesh
0

गोंदिया (प्रतिनिधी): भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा देणारे आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक ठरलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत यंदा आपल्या १५०व्या वर्षात प्रवेश करत आहे. या ऐतिहासिक गीताच्या सार्धशताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन” म्हणून हा सोहळा शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता इंदिरा गांधी स्टेडियम, गोंदिया येथे साजरा होणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन असून, शहरातील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. देशभक्तीच्या भावनेने ओथंबलेला हा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे तहसीलदार मा. श्री. समशेर पठान राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मा. श्री. प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. एम. मृगनाथन, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक मा. श्री. सारंग पटले आणि आय.एम.सी. गोंदियाचे अध्यक्ष मा. डॉ. विजय गंदेवार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री. दलजीत सिंग खालसा असून, निमंत्रक म्हणून प्राचार्य श्री. आर. बी. गणवीर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. बी. एन. तुमडाम, तसेच गटनिदेशक श्री. ए. ए. शिंदे, श्री. जी. एम. श्रीगिरीवार, सौ. जे. एस. धोटे आणि श्री. पी. एल. कटरे आदी मान्यवर उपस्थित राहतील.

या भव्य सोहळ्याचे आयोजन महर्षि अरविंद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया यांनी केले असून, संस्थेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी तयारीत आहेत. हा उपक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेले गीत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान ठरले. या गीतातून देशभक्ती, एकात्मता आणि मातृभूमीप्रेमाचा संदेश मिळतो. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतमातेच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)