शब्दसंदेश न्यूज गोंदिया दि. 2 : शासन आणि माणुसकीच्या नात्याने आपण सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. बाधित शेतकऱ्यांना पुरेपूर मदत मिळावी यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.
आज पालकमंत्री नाईक यांनी गोंदिया जिल्ह्याचा दौरा करून सडक-अर्जुनी, देवरी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया या तालुक्यांमधील अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री नाईक म्हणाले की, जिल्ह्यातील ९०० गावे बाधित झाली असून २९ हजार ५०.४० हेक्टर शेती क्षेत्र बाधित आहे. या अंतर्गत ६० हजार ७३ शेतकरी बाधित झाले आहेत. दिवाळीच्या आधी व नंतर झालेल्या पावसामुळे बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसानंतर ३३९ गावांचे पंचनामे पूर्ण झाले होते, मात्र पुन्हा झालेल्या पावसामुळे फेरपंचनाम्यांची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
पाहणीदरम्यान मिळालेल्या सूचनांनुसार, शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याची कार्यवाही थांबवावी, अशा स्पष्ट सूचना नाईक यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिल्या. शेतकऱ्यांना व कास्तकारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
नाईक पुढे म्हणाले, बाधित क्षेत्रातील ३० टक्के पीक विक्रीस परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेणार आहे. या वेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी माझ्यासोबत उपस्थित राहावे असेही सांगितले.
राज्यातील सर्वाधिक धान उत्पादन असलेला गोंदिया जिल्हा सर्वाधिक नुकसानीला सामोरा गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक तालुक्यात नुकसानाचे प्रमाण वेगवेगळे असले तरी शासन या संदर्भात योग्य ते निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
