शब्दसंदेश न्यूज गोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सोनबिहरी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करून विनयभंग केला. या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापकाला गुरुवारी (ता. ४) बेड्या ठोकल्या. ओमप्रकाश मनिराम पटले (वय ४७) असे आरोपीचे नाव आहे.
सोनबिहरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहा वर्षीय विद्यार्थिनीशी गत काही महिन्यांपासून आरोपी ओमप्रकाश पटले हा अश्लिल चाळे करीत होता. यामुळे तिच्या वागणुकीत पालकांना फरक जाणवला. तिला विश्वासात घेऊन पालकांनी विचारणा केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पालकांनी गुरवारी मुलीसह दवनीवाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मुख्यध्यापकाला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी (ता. ५) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली.
