शब्दसंदेश वार्ता गोंदिया : मुलाच्या विम्याची रक्कम व जमीन सुनेला मिळू नये यासाठी सासऱ्याने आपल्या सुनेचा अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम गिधाडी येथील हे प्रकरण असून १९ नोव्हेंबर रोजी २०२५ रोजी हा अपघात घडविण्यात आला होता.
गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम गिधाडी येथील रहिवासी आरोपी चुडामन कटरे याचा मुलगा उमेश कटरे याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या विम्याचे ६० लाख रुपये व जमीन त्याच्या पत्नीला (२६, रा. गिधाडी) मिळू नये यासाठी चुडामन कटरे याने आपल्या सुनेलाच मारून टाकण्याचे ठरवले. अशातच १९ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्यादी सून व तिचे वडील मोपेड ने मौजा गिधाडी येथे चिलाटी मार्गाने जात असताना घोटी नाल्याजवळ अज्ञात आरोपींनी निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली होती. या अपघातात फिर्यादी गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ६६०/२०२५ अन्वये बीएनएस व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाच्या तपासादरम्यान तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीदारांच्या आधारे चुडामन कटरे याने इतर आरोपींना तीन लाख रुपयांची सुपारी देऊन हा अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात कलम १०९ व ६१ (२) बीएनएस वाढवली असून, एक आरोपी अटकेत आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे व पोलिस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सुजित घोलप, हवालदार नागेश बोपचे व शिपाई महेंद्र भोयर यांनी केला.
