शब्दसंदेश न्यूज:भामरागड तालुक्यातील येचली परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम काकाने मागील तीन वर्षांपासून वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मत्रेराजाराम पोलिसांनी नराधम काकास बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती शिक्षण घेत आहे. आरोपी दुर्गे (४८ वर्षे) हा नात्याने पीडितेचा काका लागतो. रक्ताच्या नात्यावर विश्वास ठेवून असलेल्या या चिमुरडीच्या असहायतेचा फायदा घेत आरोपीने गेल्या तीन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारीन, अशी धमकीही त्याने पीडितेली दिली होती. त्यामुळे भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या पीडितेने अखेर धैर्याने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.
पीडितेने आपल्या आईसह मत्रेराजाराम पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (२), ६५ (१), ३५१ (२) (३) तसेच पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी १० मार्च रोजी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे करीत आहेत. नराधम काकावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
