बैलजोडीनेच ओढले मृत्यूच्या दारात !: शेतात चिखलणी करताना बैल बिथरले, ओढत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; पत्नीच्या डोळ्यासमोरच थरार

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज भंडारा: शेतीची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत आणि आर्थिक टंचाईमुळे ट्रॅक्टरचे भाडे परवडत नाही म्हणून घेतलेली बैलजोडीच एका शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लाखांदुर तालुक्यातील मांदेड येथील मधुकर नामदेव राऊत (40) या शेतकऱ्याचा शेतात चिखलणी करत असताना बैलांनी ओढत नेल्यामुळे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज, शुक्रवारी (दि. 13 मार्च) दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, मधुकर राऊत यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यापैकी दीड एकर त्यांच्या वाट्याला होती. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच कर्जाची तडजोड करून बैलजोडी खरेदी केली होती. त्या माध्यमातून ते आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने मशागत करत होते. आज दुपारी ते स्वतःच्या शेतात धानाच्या रोवणीसाठी लाकडी फण आणि बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करत होते. दरम्यान, अचानक बैल बिथरले आणि त्यांनी मधुकर यांना फणासह ओढत नेले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि चिखलात गुदमरल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीच्या डोळ्यासमोर थरार

हा संपूर्ण थरार मधुकर यांच्या पत्नीने आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र शेजारील शेतकरी धावून येईपर्यंत मधुकर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. लाखांदुर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

मधुकर राऊत यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज असलेल्या राऊत कुटुंबावर या दुर्घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परीवाराचा मुख्य आधार गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)