मोहफूल वेचण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने घेतला बळी

Shabd Sandesh
0
बाम्पेवाडा येथील धक्कादायक घटना ; परिसरातील नागरिकांत प्रचंड दहशत


शब्दसंदेश साकोली : तालुक्यातील बाम्पेवाडा येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतालगतच्या जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. वसंत गणपत मेश्राम (५२) रा. बाम्पेवाडा असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली असून मोहफूल वेचणीच्या हंगामावर भीतीचे सावट पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी वसंत मेश्राम हे नेहमीप्रमाणे गावाजवळील कम्पार्टमेंट क्र. १४३ मधील राखीव जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. मोहफूल वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. वाघाने त्यांच्या नरडीचा घोट घेऊन त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विभागीय वनधिकारी अमोल नागे, भंडारा व्यवस्थापक विजय सहाय्यक पाटील, एस. यु. वनपरिक्षेत्र अधिकारी कायते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

वनविभागाच्या वतीने पीडित कुटुंबाला तातडीने २० हजार रुपयांचे रोख सहाय्य आणि १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. वसंत मेश्राम यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार असून, त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.


        मोहफूल हंगामावर संक्रांत

सध्या मोहफुल वेचणीचा हंगाम जोमात सुरू आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असतो. मात्र, बाम्पेवाडा परिसर नागझिरा अभयारण्याला लागून असल्याने वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. या जीवघेण्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांच्या सततच्या वावरामुळे शेतात जाणे कठीण झाले आहे. वनविभागाने हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी सुरक्षितपणे आपले काम करू शकतील.

वनविभागाचे नागरिकांना आवाहन

हल्याच्या घटना घडू नयेत म्हणून वन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यात जंगलात किंवा शेत शिवारात जाताना नेहमी गटाने जावे. पहाटे अंधारात न जाता सूर्योदय झाल्यानंतरच घराबाहेर पडावे. सोबत टॉर्च किंवा काठी ठेवणे आवश्यक आहे. झाडाखाली वाकून मोहफूल वेचताना आपली मान खाली असते, ज्यामुळे प्राण्याला आपण भक्ष्य वाटू शकतो. अशा वेळी आपसात गप्पा मारावे किंवा मोबाईलवर गाणी लावां, जेणेकरून आवाजामुळे प्राणी जवळ येणार नाहीत. झाडाखाली जाण्यापूर्वी आजूबाजूला वाघ किंवा बिबट्याच्या पाऊलखुणा किंवा हालचाल तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी. 'मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलनातून मजुरांना नक्कीच आर्थिक आधार मिळतो, पण हे करत असताना स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. मोहफूल मिळविण्याच्या नादात कोणत्याही प्रकारचे धाडस किंवा कृत्य करू नका ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होईल,' असे आवाहन ही वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)