शब्दसंदेश न्यूज | भंडारा, दि. ११ सप्टेंबर २०२६ :
भंडारा जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स गाडीची भीषण धडक होऊन ८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये छत्तीसगड राज्यातील मजुरांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स गाडीने नागपूरच्या दिशेने प्रवास करीत होते. पिंपळगाव येथील एका पेट्रोल पंपावरून आयशर ट्रक महामार्गावर येत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्सने आयशर ट्रकला जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्स गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात ट्रॅक्समधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नॅशनल हायवे पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व बचाव पथकाने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णवाहिकेतून भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी नॅशनल हायवे पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, अपघाताचे नेमके कारण आणि मृत-जखमींची ओळख याबाबत पुढील तपास सुरू आहे.
