विज्ञान नाट्योत्सवात छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार बाजी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
शब्दसंदेश न्यूज देवरी, दि. ४ सप्टेंबर २०२६ :
गटसाधन केंद्र, देवरीतर्फे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरी येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांनी ‘पेट्रोल-डिझेलला पर्याय – माझी EV कार’ हे नाटक सादर करून वाढते प्रदूषण, इंधनटंचाई आणि वाढत्या इंधनदरांवर इलेक्ट्रिक वाहनांचा प्रभावी पर्याय मांडला. समीक्षा पाथोडे, त्रिवेणी बारसे, अनन्या पवार, नम्रता कावळे, राजलक्ष्मी मोटघरे व आकांक्षा कोरेटी या विद्यार्थिनींनी दमदार अभिनय व अचूक संवादातून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय कावळे होते. प्रमुख अतिथी म्हणून विजयजी लोथे, वलथरे सर, मस्के सर व शहारे सर उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष झामसिंग येरणे, सचिव अनिलकुमार येरणे, सर्व पदाधिकारी व प्राचार्य एम. जी. भुरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नाटकाचे लेखन व मार्गदर्शन विज्ञान शिक्षक एम. आर. तांडेकर यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
