१५ दिवसांत तीन हल्ले; भंडारा जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला, वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अरविंद उके | शब्दसंदेश न्यूज
भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाघ व बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पवनी तालुक्यातील मिन्सी-तिर्री मार्गावरील तिर्री गावात घरात पाळण्यात झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालून त्याला उचलून नेले. या दुर्दैवी घटनेत बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन बोंद्रे यांचा सहा महिन्यांचा बालक घरात पाळण्यात झोपलेला असताना सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या दरम्यान बिबट्याने घरात प्रवेश केला. त्यावेळी बालकाची आई हेमलता बोंद्रे स्वयंपाक करीत होत्या. अचानक बिबट्याने पाळण्यात झोपलेल्या बालकाला उचलून नेले. हा प्रकार लक्षात येताच आईने आक्रोश करीत बिबट्याच्या मागे धाव घेतली; मात्र बिबट्या बालकाला घेऊन नजरेआड झाला होता.
ग्रामस्थांनी तातडीने शोधाशोध सुरू केली असता बिबट्या जवळील तुरीच्या शेतात बालकाला घेऊन लपल्याचे आढळले. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. जवळपास अर्धा तासानंतर बिबट्याने बालकाला सोडले; मात्र तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक प्रसंगाने उपस्थितांचे मन सुन्न झाले असून बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पंधरा दिवसांत तीन हल्ले; जिल्हा हादरला
जिल्ह्यात अवघ्या पंधरा दिवसांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. ५ नोव्हेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील दोनाड शेतशिवारात आठ वर्षीय मोक्ष सचिन बुरडे याला बिबट्याने ठार केले. त्यानंतर लाखनी तालुक्यातील बामणी येथे २७ वर्षीय कुणाल ऊर्फ विशाल उईके याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आता तिर्री येथील सहा महिन्यांच्या बालकाच्या मृत्यूने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वनविभागाच्या कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात वाढत्या वन्यप्राण्यांच्या वावरामुळे लहान मुले, महिला व वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, संवेदनशील गावांमध्ये गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
अवघ्या सहा महिन्यांच्या निष्पाप जीवाचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला अंत ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना आहे. वन्यजीवांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणि मानवी वस्त्यांमधील नागरिकांचे संरक्षण यासाठी वनविभागाने आता ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
