अरविंद उके शब्दसंदेश न्यूज साकोली : पोलीस स्टेशन साकोली अंतर्गत एन.एच. ५३ रोड, चारगाव फाटा येथील हायवे पॉईंट धाब्यासमोर गुरुवारी दि. ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता गांजा विक्रीसाठी दोन इसम येणार असल्याची गोपनीय खबर पोलिसांना मिळाली होती. या खबरवरून साकोली पोलिसांनी तातडीने सापळा रचून मोठी कारवाई केली. सापळा कारवाईत पोलिसांनी आरोपी साहिल संजय पवार, (२९) आणि राम महती समाने, (३५), दोन्ही रा. ठाणे (महाराष्ट्र) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन ट्रॉली बॅगमध्ये एकूण १२.६४६ किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ६ लाख ३२ हजार ८०० रुपये इतकी आहे.
आरोपी हे गांजा विक्रीच्या उद्देशाने चारगाव फाटा परिसरात आले होते. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा गांजा कुठून आणला, कोणाला विकायचा होता, यामागे आणखी कोणती टोळी आहे का, याचा तपास साकोली पोलीस करीत आहेत. याप्रकरणी साकोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तसेच जोतिका इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी, अतिरिक्त कार्यभार साकोली यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन साकोलीचे ठाणेदार नितीन राठोड, पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर, पोलीस हवालदार कैलास मेंढे, अनिक राऊत, काशिनाथ झिंगाड, पोलीस अंमलदार नरेंद्र झलके, सचिन राऊत, धनविजय गणवीर, टेकचंद बुरडे, चंद्रहास थेर यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.
