देवरी-गोंदिया महामार्गावरील साखरीटोला शिवारातील घटना..
देवरी शब्दसंदेश न्यूज, दि.१२
देवरी-गोंदिया महामार्गावरील साखरीटोला शिवारात भरधाव टँकरच्या चालकांनी लापरवाहिने चालवून ७० वर्षीय इसमास चिरडले. ही घटना दिनांक ११ जून २०२५ सायंकाळी ४:३० वाजता सुमारची आहे. दागोजी बहेकार (वय ७०) राह. शिंगाटोला (कोटरा) असे मृतकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, देवरी-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर टँकर क्र. ए.पी.०२ टी.सी. २५१३ हा खाद्यतेल असलेला टँकर देवरी कडून गोंदियाकडे जात होता. तर मृतक दागोजी बहेकार हे दुचाकी क्र. ३५ ए.एफ.८३५८ सातगाव सालेकसा मार्गाने जात होते. साखरीटोला येथील पीएचसी चौकातील चौरस्त्यावर भरधाव टँकरच्या चालकाने निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीचालक दागोजी बहेकार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, मृतकाचे दोन्ही पाय तुटून वेगळे झाले होते. या अपघातानंतर टॅंकर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली. पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण बुराडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद सालेकसा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
