खरीप हंगामाची तयारी खोळंबली पावसाअभावी बळीराजाची चिंता वाढली
शब्द संदेश न्यूज, देवरी दि.१५
रोहिणी नक्षत्र संपले मृग नक्षत्रात ही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे आसपासच्या भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी ठप्प झाली आहे. पावसाच्या लवकर आगमनाच्या अपेक्षेने मशागतीची कामे उरकलेले शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
जून महिना मध्यावर आला असतानाही अजून पर्यंत पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनात अडथळे येत असून वेळेवर लागवड न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
रब्बी हंगाम संपता शेतकऱ्यांनी मशागतीची कामे नांगरणी, तन वेचने, शेतातील कचरा जाळणे, युद्ध पातळीवर पार पाडली. काही शेतकऱ्यांनी तर बी बियाणे ही साठवून ठेवले आहेत. पहिल्या सरी पडल्यानंतर पेरणी करण्यासाठी बळीराजा पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, वरून अवकाळी ढगांची गर्दी असूनही अद्याप एकही ठोस पावसाची सर न झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेवर पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. या आधारे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती पूर्ण केली होती. मात्र सध्याच्या कोरड्या हवामानामुळे आशेवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.
बळीराजा आशेवर तग धरून
दररोज पहाटे पाच वाजता शेतकऱ्यांचे काम सुरू होते. आज पाऊस येईल या आशेने अनेक जणांनी पुन्हा पुन्हा आकाशात डोळे रोखून ठेवले आहेत. ढग जमले की आशा वाढते, पण काही तासातच ते विरघळून जाते. रोहिणीच्या अपेक्षा भंगानंतर आता मृगावर लक्ष केंद्रित झाले आहे. या नक्षत्रात जरी मुसळधार पाऊस झाला तर उशिरा का होईना खरीप सुरू करता येईल अशी अपेक्षा अजूनही शिल्लक आहे. देवरी व परिसरातील खरीप हंगाम सध्या हवामानाच्या अनिश्चितेमुळे खोळंबला आहे. निसर्गाची थोडी साथ मिळाली तर, बळीराजाची तयारी पूर्ण आहे.
