छत्रपती संभाजीनगर शब्दसंदेश न्यूज, दि.१६
महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना दिनांक १५ जून २०२५ च्या सायंकाळी चिकलठाणा परिसरात घडली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चिकलठाणा हनुमान चौकात जालना रोडवर जोरदार रस्ता रोको आंदोलन छेडले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मृतकामध्ये कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५०) आणि बाळू उर्फ बालाजी जनार्दन दहीहंडे (वय ३०) या काका पुतण्याचा समावेश आहे. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतात मशागत सुरू असताना विद्युत तारेच्या शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या वादळात या भागातील वीज वाहिनी तुटली होती. स्थानिकांनी याची वेळोवेळी माहिती महावितरणाला दिली होती. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आज ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
घटनेनंतर तातडीने मोठ्या प्रमाणात मृतकांचे नातेवाईक शेतकरी आणि नागरिक हनुमान चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. कबरीज चौक ते विमानतळ या दोन्ही दिशांना वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.घटनास्थळी मोठा जमाव जमलेला असल्याने, दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.
संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत जिल्हाधिकारी घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता रास्ता रोको मागे घेण्यात आला. दरम्यान, जालना रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.
