शब्दसंदेश न्यूज,देवरी दिनांक २४ जून
मागील काही दिवसांपासून उष्णतेचा कहर सुरू होता. त्यामुळे मृग नक्षत्र सुरू होऊनही पाऊस कोसळत नसल्याने खरीपाची पेरणी खोळंबली होती. पाऊस येणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. हवामान खात्याचे अंदाजही फोल ठरायला लागले. मृग नक्षत्रातील कोल्ह्याने दगा दिला अशी वयोवृध्दात नागरिकांत चर्चा सुरू असताना आद्रा नक्षत्र प्रारंभहोताच पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना कोसळत असलेला पाऊस आनंददायी ठरत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी विशेषतः हवामान खात्याच्या अंदाजावर अवलंबून असतो.
पण कधी कधी हवामान खात्याचाही अंदाज फोल ठरत असतो. तर काही भागात आताही पक्ष्यांच्या घरट्यावरून पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तर कुठे नक्षत्राच्या वहानावरूनही पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला जातो. व कुठे भेड मांडणी करून पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. पाऊस कोसळण्यासाठी देवाला साकळे घातले जाते. बाहुला बाहुलीचे लग्न लावून पाऊस कोसळण्यासाठी प्रार्थना केली जाते.
वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे पाऊस कोसळण्याचे अंदाज व्यक्त केले जाते. यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने कहर केला. त्यात उन्हाळी हंगामात सर्वाधिक धानाचे नुकसान झाले. मात्र त्यानंतर मृग नक्षत्र कोरडाच गेल्याने शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतानाच सोमवारला सायंकाळच्या सुमारास आद्रा नक्षत्राच्या पर्वावर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. मात्र मृग नक्षत्रात कोल्ह्याने दगा दिल्याने पेरणी लांबणीवर पडल्याची चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.