शब्दसंदेश न्यूज दिग्रस/प्रतिनिधी, दि.२४
आयुष्याच्या उंबरठ्यावर असलेला २२ वर्षीय अब्दुल जावेद अब्दुल बशीर या युवकाचा भीषण अपघात झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने अमरावती येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि या शस्त्रक्रियेसाठी सुमारे पाच लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
ही ऐकून रुग्णाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. परिस्थिती सामान्य असलेल्या कुटुंबाला एवढी मोठी रक्कम उभारणे कठीण जात होते. कर्ज काढले तर परतफेड कशी करायची, या विवंचनेने ते व्यथित झाले.
अशा गंभीर प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांनी इरफान खान व शहादत खान यांच्या मार्गदर्शनाने खासदार संजयभाऊ देशमुख यांची भेट घेतली. नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या संजयभाऊंनी तात्काळ आपले स्वीय सहाय्यक गजानन कदम यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले.
गजानन कदम यांनी १९ जून रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला आणि सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना रामेश्वर नाईक (कक्षा प्रमुख) आणि अँड. विशाल ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या सर्व समन्वयामुळे अवघ्या तीन दिवसांत, २१ जून रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून १ लाख रुपयांची तातडीची मदत मंजूर करण्यात आली.
ही मदत वेळेवर मिळाल्यामुळे रुग्णाच्या उपचारांचा मार्ग मोकळा झाला असून, कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे भाव उमटले. त्यांनी संजयभाऊ देशमुख, रामेश्वर नाईक आणि अँड. विशाल ठाकरे यांचे मन:पूर्वक आभार मानले.
या प्रकरणात वेळेवर झालेली शासकीय मदत, लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग व प्रशासनातील संवेदनशीलता हे एक समाजाला आश्वस्त करणारे सकारात्मक उदाहरण ठरले आहे.