रेती चोरीच्या वादातून निर्दयीपणे सपासप ३७ वार

Shabd Sandesh
0
ग्रा.पं. सदस्याची हत्या : 'त्या' चाकूचे दोन तुकडेच झाले!

शब्दसंदेश खापरखेडा, दि.१८: 

रेती चोरीच्या वादातून पिपळा (डाकबंगला), ता. सावनेर येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल तुळशिराम पाटील (३२) याच्या शरीरावर आरोपीने चाकूने सपासप तब्बल ३७ वार केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीच्या डोक्यात एवढा क्रोध होता की वार करण्याच्या धुंदीत चाकूचे दोन तुकडे झाले तरी आरोपी थांबला नाही. शेवटी डोक्यावर दगडाने वारही केले. पोलिसांनी चाकूचे दोन्ही तुकडे व दोघांच्या दुचाकी घटनास्थळाहून जप्त केल्या आहेत.
या प्रकरणात मुख्य आरोपी हिमांशू कुंभलकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुक्ता कोकडे यांचे पती व सरपंच विष्णू कोकडेला अटक करण्यात आली आहे. या हत्येमागील राजकीय कनेक्शन समोर येताच परिसरात संतापाची लाट पसरली. आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, किशोर चौधरी व नागरिकांनी घटनास्थळाजवळ मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास निदर्शने केली. रास्ता रोकोचा प्रयत्न झाला. प्रकरण शीघ्रगती न्यायालयात चालवावे व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मृत अतुल हा किशोर चौधरी यांचा विश्वासू समर्थक होता.
हत्या केल्यानंतर आरोपी हिमांशूच्या चेहऱ्यावर अपराधीपणा किंवा पश्चात्तापाचे भाव नव्हते. हत्या करण्याचा प्रकार व त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा निर्धावलेपणा स्पष्ट दिसत होता. या हत्येची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी पिपळा (डाकबंगला) येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला घटनास्थळाजवळ निदर्शने होताच तिथे शीघ्रकृती दल व अतिरिक्त पोलिस कुमक तैनात करण्यात आली. निदर्शनादरम्यान नारेबाजी अथवा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. घटनास्थळासोबत गावात दिवसभर स्मशानशांतता होती. सावनेर शहरात उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर सायंकाळी अतुलचा मृतदेह पिपळा
(डाकबंगला) येथे आणला. पोलिस बंदोबस्तात स्थानिक स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अतुलची विनवणी... 'मला लहान मुलगा आहे, नको मारू
हिमांशूने अतुलच्या गळ्यावर चाकूने पहिला वार करताच अतुलने चाकू पकडला. दुचाकी खाली पडताच दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यात हिमांशूच्या हात व कानाला चाकू लागला. त्यानंतर त्याने अतुलवर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. वार सहन करीत असताना 'मला लहान मुलगा आहे, नको मारू' अशी विनवणी अतुल करीत होता. त्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. मात्र, हिमांशूच्या काळजाला पाझर फुटला नाही. तो लगेच दुचाकीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेला आणि पोलिसांच्या हाती लागला.
...............
पत्नीचा वाढदिवस आणि पती विष्णूला अटक
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुक्ता कोकडे यांचा मंगळवारी (दि. १७) वाढदिवस होता. पती विष्णू व मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याची योजनाही त्यांनी आखली होती. मात्र, पोलिसांच्या हाती लागताच हिमांशूने तोंड उघडले आणि पोलिस मंगळवारी पहाटे मुक्ता कोकडे यांच्या दारात उभे झाले. विष्णूने हिमांशूकडून अतुलची हत्या करवून घेतली, अशी माहिती पोलिसांनी देताच मुक्ता यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि वाढदिवसाच्या आनंदावर विरजण पडले.
........................
भाजप कार्यकर्त्यांनी केले चक्काजाम आंदोलन
मृतक अतुल हा भाजपचे नेते किशोर चौधरी यांचा अति विश्वासू समर्थक होता. या हत्येला एक राजकीय वळणही मिळाले आहे. किशोर चौधरी यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि मृतक अतुल यांच्या समर्थकांना पिपळा येथे सोबत घेऊन आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. यावेळी पिपळा येथील वातावरण तापले होते. त्यामुळे पोलिसांचे पथक येथे तैनात करण्यात आले होते. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ तसेच आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून फास्ट ट्रक न्यायालयात खटला चालविण्यासह फाशीच्या शिक्षेची मागणी करता पिपळा (डाकबंगला) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार आशीष देशमुख, किशोर चौधरी, मनोहर कुंभारे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)