वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

Shabd Sandesh
0
सोनेखारी/येरमळा परिसरातील घटना..
शब्द संदेश न्यूज आमगाव, दि.१४

    आमगाव तालुक्यात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या दहशत निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. १२ जून रोजी सकाळी सुमारे ९:०० वाजताच्या सुमारास सोनेखारी ते येरमाळा रस्त्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या घरातून वाघाने गाईच्या वासराची शिकार केली आणि ते वासरू उचलून थेट जंगलात घेऊन गेला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसरात बंदोबस्त लावण्यात आला असून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या परिसरात मनरेगा अंतर्गत कामे सुरू असताना, ही घटना घडल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून मनरेगाची सर्व कामे तातडीने थांबविण्यात आली आहेत. 
वन्य प्राण्याच्या या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाली असून खंडविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व इतर स्थानिक पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत परिसरात सावध राहण्याचे आवाहन केले. तसेच वाघाच्या संभाव्य हालचालीचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे बसविण्याचा आणि गस्ती वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे सोनेखारी ते येरमाळा मार्गावरील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील काही काळातही या भागात वाघाच्या हालचाली झाल्याचे संकेत मिळाले होते. मात्र, ही घटना वन्यजीव मानव संघर्षाची गंभीर जाणीव करून देणारी आहे. वन विभागाने गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस एकट्याने बाहेर न जाण्याचा सल्ला दिला असून पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभाग आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे उपाययोजना करत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)