विमानात एकूण २३२ प्रवासी १०५ जणांचा मृत्यु झाला असल्याची प्राथमिक माहिती
शब्दसंदेश न्यूज,
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमानअपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद विमानतळावर विमान कोसळून हा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हिडीओही समोर येत आहेत. विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत.
हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे की या विमानात २४२ प्रवासी होते.एअर इंडियाच्या बोइंग ७८७ या प्रवासी विमानाचा अपघात झाला असून यामध्ये २४२ प्रवासी होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात ते कोसळलं. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडीओंमध्ये दिसतंय. दरम्यान, अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केलं आहे.या विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे.