महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला प्रतिसाद नाही; कार्यक्षमता धोक्यात

Shabd Sandesh
0

पुरस्कार घेऊन समित्या निष्क्रिय; गावात पुन्हा फुटले तंट्याचे पेव

शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.०१: ग्रामीण भागातील लहानसहान तंटे गावातच मिटवून शांतता राखण्यासाठी राबविण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती योजना सध्या केवळ कागदावरच उरली आहे, असे वास्तव समोर येत आहे. किरकोळ वाद-भांडणांसाठीसुद्धा गावकऱ्यांनी पोलिस ठाण्याचा रस्ता धरायला सुरुवात केली असून, समित्यांचा प्रभाव जवळपास संपल्याचे चित्र आहे.
    या योजनेत गावातील वाद गावातच मिटवून ग्रामस्थांचा पैसा व वेळ वाचविण्याचा हेतू होता. सुरुवातीच्या काळात या समित्यांनी चांगले काम करत अनेक तंटे गावातच मिटवले आणि गावांना शांतता राखल्याबद्दल पुरस्कारही मिळाले. अनेक ठिकाणी तंटामुक्त भवन उभारण्यात आले आणि पोलिस ठाण्यात तक्रारी कमी झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षात या समित्यांमध्ये राजकारण व अवैध व्यवहार वाढल्याचा आरोप होत आहे. अध्यक्ष व सदस्य निवडीवरून गावागावांत रस्सीखेच सुरू झाली असून, या समित्यांचा कारभार ठप्प झाल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, तंटामुक्त समित्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमेवरून अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले होते. परिणामी गावकऱ्यांचा विश्वास कमी झाला आहे. सध्या किरकोळ कारणांवरूनसुद्धा ग्रामस्थ थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत आहेत.

पुरस्कारांसाठी गावागावांत होती चढाओढ

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ज्या गावांनी गावात जास्त तंटे मिटविले आणि शांतता प्रस्थापित केली, अशा गावांना शासनाकडून पुरस्कार सुरू करण्यात आले. यातून अनेक ठिकाणी तंटामुक्त भवनही उभारण्यात आले. पोलिस ठाण्यात तक्रारी येण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, आता ही योजना कागदावरच उरली असल्याचे चित्र असून, गावातील भांडण-तंट्यांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात जात आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)