देवरी परिसरात दमदार पाऊस
शब्दसंदेश न्यूज देवरी, दि.०१
मागील काही दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असतांना अखेर देवरी परिसरात मागील दोन दिवसांपासून पाऊसधारा बरसल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आनंदाने फुलले असून शेतकरी खरीफ पिकांच्या पेरणीसाठी सज्ज झालेला आहे.
मे महिन्यात अवकाळी पावसाने कहर केला होता. त्यात कोसळलेला पाऊस उन्हाळी हंगामातील धानाचे नुकसान करून गेला. त्यानंतर पावसाने कोरड दिली. जून महिना अर्धा कोरडाच गेला. दोन नक्षत्र कोरडे गेल्यावर आद्रा नक्षत्रात पाऊस कोसळला. त्यामुळे खरीप पिकांची अनेक शेतकऱ्यांनी लागवड करणे सुरू केले आहे. एकंदरीत पाऊस कोसळत असल्याने उष्णतेच्या उकाळ्यात गारव्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
पावसाळा नक्षत्राला सुरवात होऊन जवळपास एक महिन्याच्या वर दिवस लोटून गेले. रोहणी नक्षत्र कोरडा गेल्याने दि. ७ जूनला मृग नक्षत्र लागला या नक्षत्रात शेतकरी शेतीची मशागत करून धानाची पेरणी करीत असतो. मृग नक्षत्राच्या धारा बरसणार! असे वाटत असतांना पाहिजे त्या प्रमाणात पाऊसाच्याधारा बरसल्या नसल्याने बळीराजा चिंतातूर होता. मात्र मृग नक्षत्र संपून जेमतेम चार पाच दिवस आद्रा नक्षत्र लागून झाले असतांना मागील दोन दिवसापासून आद्रा नक्षत्राच्या पाऊस धारा देवरी परिसरात बरसत असल्याने शेतकऱ्यांना या पाऊसाचा चांगलाच फायदा झाला. यात शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेले बियाणे यांना अंकुर फुटले. त्यामुळे देवरी परिसरातील शेतकऱ्यांच्या धान याचा चांगलाच फायदा झाला.
मागील काही दिवसापासून परिसरात तापमान वाढलेला असताना या पाऊसापासून काही दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना थोडी फार उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. आता बळीराजा पेरणी करून सज्ज झाला असून दमदार पाऊसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे.