दुचाकी वरून जाताना वाऱ्याने छत्री उलटली; मागे बसलेली आई जीवाला मुकली

Shabd Sandesh
0
कोल्हापुरातील दुर्दैवी घटना
शब्दसंदेश न्यूज कोल्हापूर, दि.०३: मुलाच्या दुचाकीवर मागे बसून महापालिकेत जाताना वाऱ्याने छत्री उलटी होताच तोल जाऊन पडल्याने मीना दिलीपराव मगदूम (वय ५९, रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. त्या महापालिकेत आस्थापना विभागात शिपाई पदावर कार्यरत होत्या. ही दुर्घटना मंगळवारी (दि. १) सकाळी दहाच्या सुमारास महाद्वार रोडवर घडली. आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले. आता नातवंडांसोबत खेळण्यापूर्वीच काळाने घाला घातला. निवृत्तीला वर्षभराचा कालावधी उरला असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मगदूम यांच्या पतीचे २५ वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. ते महापालिकेत पवडी विभागात होते. मीना यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर खचून न जाता त्यांनी दोन मुले आणि मुलीचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा सोनार काम करतो. लहान मोबाइल दुकानात काम करतो. मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न लावून दिले. दीड महिन्यापूर्वीच लहान मुलाचे लग्न झाले.
वर्षभरात त्या निवृत्त होणार होत्या. निवृत्तीनंतर नातवंडांसोबत आयुष्याची संध्याकाळ निवांत घालवायचा विचार त्यांनी अनेकदा नातेवाइकांकडे बोलून दाखवला होता; पण काळाने अचानक घाला घातल्याने सुख उपभोगण्यापूर्वीच त्यांची एक्झिट झाली.
..............
नाका-तोंडातून आले रक्त
लहान मुलगा त्यांना रोज महापालिकेत सोडून पुढे मोबाइल दुकानात जात होता. मंगळवारी सकाळी माय-लेक दोघे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून बाहेर पडले. पावसाची रिमझिम सुरू असल्याने मीना यांनी डोक्यावर छत्री धरली होती. वाऱ्याच्या झोतात छत्री उलटी झाल्याने त्या तोल जाऊन पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत होऊन नाका-तोंडातून रक्त आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)