दिल्लीतील सागरपूर भागातील हृदयद्रावक घटना
शब्दसंदेश न्यूज, दि.०२:
दिल्लीतील सागरपूर भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पावसात खेळायला जाण्याचा हट्ट केल्याने वडिलांनी आपल्या १० वर्षांच्या लेकाची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादा देव रुग्णालयातून पोलिसांना माहिती मिळाली होती की, एका मुलाला त्याच्या वडिलांनी चाकूने मारहाण केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी आणलं होतं. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आढळलं की १० वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मृत मुलगा त्याचे वडील ए. रॉय (४० वर्षे) आणि इतर तीन भावांसोबत सागरपूरच्या मोहन ब्लॉकमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. मुलाच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मुलाने पावसात खेळायला जाण्याचा हट्ट केला होता. वडिलांनी यासाठी नकार दिला, परंतु मुलाने ऐकलं नाही. याच दरम्यान, वडिलांना राग आला आणि त्यांनी स्वयंपाकघरात ठेवलेला चाकू उचलला आणि मुलाच्या छातीवर वार केला. घटनेनंतर लगेचच वडिलांनी मुलाला रुग्णालयात नेलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू देखील जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे आणि पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.