शब्दसंदेश न्यूज पाचोरा, दि०५: येथील बस स्थानक परिसरात एका दुचाकी वरून आलेल्या अज्ञातांनी आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) या तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करत त्याची जागीच हत्या केली. या घटनेनंतर मारेकरी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
या गोळीबाराच्या घटनेने पाचोरा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत आकाश मोरे यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके रवाना केली आहेत.
शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनास्थळी पोलिस अधिक्षकांची भेट
दुचाकीवरुन येवून निलेश सोनवणे याने १२ राऊंड फायर केले आहेत. त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा असून दोघे फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून लवकरच आरोपीना ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिस अधिक्षक एम. रेड्डी यांनी सांगितले.