हात-पाय बांधून शाळेत डांबले; आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
शब्दसंदेश न्यूज तिरोडा : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना तालुक्यातील परसवाडा येथे उघडकीस आली आहे. लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका नराधमाने गावातीलच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, पीडितेचे हात-पाय आणि तोंड बांधून तिला जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार आज (ता.२२) सकाळी ८ वाजता सुमारास समोर आला आहे. या घटनेमुळे तिरोडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी सुमित देवानंद ऊईके (२१) याच्याविरुद्ध ‘पोक्सो'सह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, परसवाडा येथील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी सुमित ऊईके हे एकाच गावातील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात ओळख होती. तीन महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, त्यानंतरही आरोपीचा छळ थांबला नाही. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले. त्याने तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका खोलीत नेले. तिथे ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जीवे मारीन' अशी धमकी देत लग्नासाठी दबाव टाकला. पीडितेने ठामपणे नकार दिला असता, आरोपीने क्रुरतेचा कळस गाठला. त्याने पीडितेचे तोंड, हात आणि पाय ओढणीने घट्ट बांधून तिला त्याच खोलीत बंद केले आणि स्वतः तिथून पळ काढला. दुसर्या दिवशी शाळा उघडण्यात आल्या तेव्हा हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे परसवाडासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून दवनीवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२), १४२, ६४(१), ३५१(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या भीषण कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून दवनीवाडाचे पोलिस निरीक्षक वैशाली ढाले यांनी फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिस सुत्र गतिमान केले आहेत. तसेच पथक तयार करून आरोपीचा शोध घेतला आहे. वृत्त लिहेपर्यत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास सुरू आहे.
